विधानपरिषदेच्या चार मतदारसंघात सरासरी ७१.८७ टक्के मतदान

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसेच शिक्षक, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक अशा चार मतदारसंघांमध्ये सायंकाळी सहा वाजेपर्यंत ७१.८७ टक्के इतके सरासरी मतदान झाले आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडल्याचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

कोकण पदवीधर मतदारसंघात सायंकाळी ६ वाजेपर्यंत ६३ टक्के, मुंबई पदवीधर मतदारसंघात ५६ टक्के, मुंबई शिक्षक मतदारसंघात ७५ टक्के तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात ९३.४८ टक्के इतके मतदान झाल्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नमूद केले. ही निवडणूक बुधवारी म्हणजे कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी झाल्याने मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्याचे आव्हान उमेदवारांपुढे होते. नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान झाले आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब, भाजपचे किरण शेलार यांच्यात मुख्यत्वे लढत होत आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार आहेत. गेली ३० वर्षे शिवसेनेच्या ताब्यात असलेला हा मतदारसंघ कायम ठेवण्याचे ठाकरे गटापुढे मोठे आव्हान आहे. यंदा भाजपचे किरण शेलार यांच्यासाठी भाजपने मुंबईतील आपली सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. शिवसेना ठाकरे गटाने मुंबईतील आपल्या सर्व शाखांमधून हक्काचे मतदार मतदानासाठी येतील याची खबरदारी घेण्याचा आदेश दिला आहे.

मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे सुभाष मोरे, शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर, भाजप पुरस्कृत शिवनाथ दराडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शिवाजीराव नलावडे, शिंदे गटाचे शिवाजी शेंडगे हे रिंगणात आहेत. सुमारे १५ हजार मतदार असलेल्या या मतदारसंघात जास्त नोंदणी केलेल्या उमेदवाराला विजयाची नेहमी संधी असते.

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे विद्यामान आमदार निरंजन डावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यात लढत होत आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या या मतदारसंघात सुमारे सव्वा दोन लाख मतदार आहेत. यापैकी सुमारे एक लाख मतदार हे ठाणे जिल्ह्यातील आहेत. मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी मतदान केंद्रांपर्यंत येणे हेच या मतदारसंघात मोठे आव्हान आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यामान आमदार किशोर दराडे, शिवसेना शिंदे गटाचे संदीप गुळवे असे प्रमुख उमेदवार आहेत. या मतदारसंघातील निवडणूक ही पैसे, साड्या वाटपांच्या आरोपांमुळे अधिक गाजली. शिंदे गटाने सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला.

Protected Content