जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मंदीरातून घरी जात असलेल्या एका वृध्द महिलेच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याचे मंगलपोत अज्ञात दोन चोरट्यांनी दुचाकीवर येवून जबरी हिसकावून चोरून नेल्याची घटना मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास टिळक नगरात घडली आहे. याबाबत बुधवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शारदा अर्जूनराव जाधव वय ७६ रा. मयुरेश्वर कॉलनी जळगाव या वृध्द महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. मंगळवारी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास वृध्द महिला ह्या त्यांच्या मैत्रीणीसोबत मंदीरातून घरी परत जात असतांना टिळक नगरातील रस्त्यावर अज्ञात दोन चोरटे हे दुचाकीवर आले. आणि एकाने त्यांच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीची अडीच तोळ्याची सोन्याची पोत जबरी हिसकावून धुमस्टाईल चोरून नेली. हा प्रकार घडल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली तोपर्यंत चोरटे हे दुचाकीवरून पसार झाले. याबाबत त्यांनी बुधवारी २७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे हे करीत आहे.




