हल्ला करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल :पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली (वृत्तसेवा) पुलवामा येथे दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्यांनी खूप मोठी चूक केली असून त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल असे मोदींनी म्हटले आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्की शिक्षा मिळेल. एकाही दहशतवाद्याला सोडले जाणार नाही, असे देखील ते म्हणाले. पंतप्रधांनांनी आज ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. त्यावेळी संबोधित करताना त्यांनी हा इशारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी हल्ल्यानंतर जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही असा इशारा दिला होता. शुक्रवारी एका कार्यक्रमात त्यांनी शहिदांना आदरांजली वाहत पुन्हा एकदा पाकिस्तानचं नाव न घेता इशारा दिला आहे. दहशतवादी संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांनी खूप मोठी चूक केली आहे. त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. हल्ल्यामागे जी ताकद आहे, जे गुन्हेगार आहेत त्यांना नक्की शिक्षा मिळेल असा इशारा मोदींनी दिला.अनेक देशांनी या हल्ल्याचा निषेध केला असे सांगत भारताला पाठिंबा व्यक्त करणाऱ्या सर्व देशांचा पंतप्रधान मोदी यांनी आभार मानले. जगातील दहशतवादाविरोधात सर्व मानवतावादी शक्तींनी एक होऊन लढायला हवे. दहशतवादाशी लढण्यासाठी सर्व देशांचे एकमत होईल तेव्हा दहशतवाद एक क्षणही टिकणार नाही, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला.

Add Comment

Protected Content