नाथाभाऊ काय चीज आहे ते जळगावातील शक्तिप्रदर्शनात दाखवू देईन – एकनाथराव खडसे

मुंबई वृत्तसंस्था । नाथाभाऊ काय चीज आहे ते जळगावातील शक्तिप्रदर्शनात दाखवू देईन, असे खुले आव्हान राष्ट्रवादी प्रवेशाच्या भाषणात एकनाथ खडसे यांनी भाजपाला दिले. त्यांच्या स्वभावाच्या वकुबानुसार आजही त्यांनी केलेली ही भाषा ते शांत बसणार नाहीत याची जाणीव करून देत होती.

आपल्या भाषणात भाजपच्या काही नेत्यांनी दिलेल्या मनस्तापाची खदखद नाथाभाऊंनी यावेळीही बोलून दाखवली. खालच्या पातळीवरच्या राजकीय डावपेचांबद्दल संताप व्यक्त केला. नाथाभाऊ पुढे म्हणाले कि, अत्यंत विचारपूर्वक आणि राज्यभरातील समर्थकांशी चर्चा करून मी या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या दिल्लीतील काही वरिष्ठांनी सुद्धा मला याच पक्षाला प्राधान्य देण्याचा सल्ला दिला होता. मानहानी जिव्हारी लागलेली असल्याचे नाथाभाऊंच्या बोलण्यातून यावेळीही स्पष्टपणे जाणवत होते.

नाथाभाऊ पुढे म्हणाले कि, आजही बरेच माझे समर्थक पदाची पर्वा न करता पक्षांतराला तयार आहेत, पण मी त्यांना थोपवले आहे. आज कोरोना त्रासामुळे येथे गर्दीवर मर्यादा असल्याचे भान आहे. पण मी आताच शरद पवारांना आमंत्रण देतोय कि, त्यांनी जळगावला जाहीर सभेला यावे. तेथील सगळ्यात मोठे सागर पार्क हे मैदान ओतप्रोत भरून दाखवीन आणि नाथाभाऊंचा जिल्ह्यातील जिव्हाळा सांगेन. मी ज्या वेगात भाजप वरची निष्ठा जपत काम केले. त्यापेक्षा दुप्पट वेगात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करून दाखवीन. मी कधीच पाठीत खंजीर खुपसण्याचे किंवा कुणीबाई समोर ठेऊन आरोपांचे राजकारण केलेले नाही. समोरासमोर लढलो. विद्वेषाला कधी कुठे थारा दिला नाही. माझा काय गुन्हा ? या माझ्या सभागृहातही विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर मला अद्याप मिळालेले नाही. गेली ४ वर्षे घरी शांत होतो. तसाच राजकारणातून बाहेर फेकलो गेलो असतो पण माझा पिंड संघर्षाचा आहे. त्यामुळे पुन्हा नव्या मांडणीसाठी उभा राहिलो आहे. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाची इच्छा व्यक्त करताना मी शरद पवारांकडे काहीही मागणी केली नाही किंवा काही अपेक्षा व्यक्त केलेली नाही. सभागृहातही मी कित्येकदा बोललो आहे की, शेती समजून घ्यायची असेल तर शरद पवारांना भेटल्याशीवाय समजणार नाही. मला जयंत पाटील म्हणाले होते, तुम्ही आमच्याकडे आलात तर ते तुमच्यामागे इडी लावतील त्यावर मी म्हणालो होतो कि, त्यांनी इडी लावली तर मी सीडी लावीन. सगळे सांगेन वेळ आल्यावर, विनयभंगासारखा खोटा गुन्हा माझ्यावर एक महिलेला पुढं करून नोंदवला त्यातून मी आता परवा बाहेर पडलो. सगळ्यांना न्याय देण्याचे पवार साहेबांचे धोरण सुरुवातीपासून मान्य असल्याने या पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.

स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादीचे प्रभुत्व गाजवणार- खडसे
या भाषणाच्या प्रारंभी नाथाभाऊंनी उत्तर महाराष्ट्रातील भाजपच्या लोकप्रतिनिधींची संख्या आम्ही कशी दिवसेंदिवस वाढवली हेही आवर्जून नमूद केले नगरपरिषद, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, मार्केट कमिट्या, सहकारी बँक आदी संस्थांवरील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभुत्व पुढच्या काळात गाजताना दिसेल असा शब्दही त्यांनी उपस्थितांना दिला.

यांनी केला पक्षप्रवेश
यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात तळोद्याचे माजी आमदार नरेंद्र पाडवी, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, रोहिणी खडसे खेवलकर, बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती निवृत्ती पाटील, दिल्लीच्या कृषी संशोधन संस्थेचे सदस्य कैलास सूर्यवंशी, मुक्ताई सूतगिरणीचे उपाध्यक्ष राजू माली, भाजप सरचिटणीस संदीप देशमुख, दूध संघाचे संचालक मधुकर राणे, दूध संघाच्या अध्यक्ष मंदाताई राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Protected Content