चाकूहल्ला करून तीन महिन्यांपासून फरार असलेल्या हल्लेखोराला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी ।  शहरातील सम्राट कॉलनी येथे जुन्या वादातून तरुणावर चाकूहल्ला करणारे फरार झाले होते. त्यातील एका संशयिताला एमआयडीसी पोलीसांनी शुक्रवारी 6 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता पाळधी येथील एका हॉटेलमधून शिताफीने ताब्यात घेतले. त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. गुन्हा केल्यानंतर तीन महिन्यापासून तो फरार होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, सम्राट कॉलनी येथे २८ जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास जुन्या वादातून शुभम भगवान माळी (रा. सम्राट कॉलनी,जळगाव) याचेवर दीक्षित वाडी येथील राहणारा ललित उमाकांत दीक्षित व त्याच्यासोबतचे दोन साथीदार यांनी सशस्त्र हल्ला केला. शुभम याच्या उजव्या पायाच्या मांडीवर धारदार हत्याराने वार केला होता. त्यामुळे त्याला गंभीर दुखापती झाल्या होत्या. सदर शुभम माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा केल्यानंतर ललित दीक्षित हा पसार झाला होता. त्याचा शोध सुरू होता.

दरम्यान शुक्रवारी ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास तो धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे आल्याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे  यांना मिळाली होती. त्यानुसार सायंकाळी पाळधी येथील हॉटेल मातोश्री येथून संशयित ललित दीक्षित याला ताब्यात घेण्यात आले.  त्याला अटक करण्यात येऊन आज शनिवार ७ रोजी न्यायमूर्ती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली.

Protected Content