सावदा, ता. रावेर प्रतिनिधी | पालमार्गे जाणार्या आमोदा ते भीकनगाव (मध्यप्रदेश) या महामार्गाला दिवंगत खासदार, आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष स्व. हरीभाऊ जावळे यांचे नाव देण्याचा ठराव येथील नगरपालिकेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत एकमताने संमत करण्यात आला आहे.
हरीभाऊ जावळे यांच्या पाठपुराव्यामुळे आमोदा-पाल-भीकनगाव या आंतरराज्यीय महामार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली होती. याचे काम पूर्ण झाले असून हा महामार्गा अतिशय दर्जेदार अशा प्रकारचा झाल्याने पालमार्गे जाणार्या वाहतुकीला गती मिळाली आहे. दरम्यान, हरीभाऊ यांच्या कार्याचे स्मरण कायम रहावे म्हणून या मार्गाला त्यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांनी केली होती. याला सर्वसाधारण सभेत मंजुरी प्रदान करण्यात आली आहे.
काल सावदा पालिकेची मावळत्या पंचवार्षिक कालावधी मधील शेवटची सर्वसाधारण सभा झाली. यात पत्रिकेवरील ३२ व आयत्या वेळेच्या विषयांवर चर्चा व निर्णय झाला. त्यात सावदा शहरातून गेलेल्या आमोदा-पाल-भिकनगाव या राज्य मार्गाला माजी खासदार स्व.हरिभाऊ जावळे यांचे, तर कोचूर रोडवरील सभागृहाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर, चांदणी चौकातील व्यापारी संकुलाचे हभप वै.जगन्नाथ महाराज अंजाळेकर नामकरणाचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला.
यासोबत पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या खर्चास मंजुरी, शहरात स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियान राबवणे. उद्यान निर्मिती, सायकलिंग ट्रॅक, सार्वजनिक इमारतीमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग, असे विषय मंजूर झाले. ही सभा नगराध्यक्षा अनिता पंकज येवले यांच्या अध्यक्षतेखाली व उपनगराध्यक्ष विश्वास चौधरी, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली.
या सभेला नगरसेवक राजेश वानखेडे, राजेंद्र चौधरी, विश्वास पाटील, नंदा लोखंडे, शबाना तडवी, करुणा पाटील, जयश्री नेहेते, मीनाक्षी कोल्हे, सतीश बेंडाळे, सगिराबी सैय्यद, किशोर बेंडाळे, लीना चौधरी, रंजना भारंबे उपस्थित होते. तसेच आमदार चंद्रकांत पाटील यांनी सावदा शहरासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने राजेश वानखेडे यांनी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.