बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव व शेगाव तालुक्यात ७ जुलै रोजी झालेल्या ढगफुटीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. आलेल्या पूरामुळे मोठे नुकसान झाले आहे, हजारो हेक्टर शेतजमीन खरडून गेल्याने शेतीचे व शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरे व घरातील समान वाहून गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. या झालेल्या नुकसानीची आज शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी पाहणी केली.
जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याशी संवाद साधून तातडीने पंचनामे करून १००% नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. तर ज्यांचे संसार उघड्यावर आले त्यांची तातडीने व्यवस्था करण्याची देखील विनंती तुपकरांनी प्रशासनाला केली आहे. तीन दिवस झाले तरी नुकसानग्रस्तांना सानूग्रह अनुदान देण्यात आले नाही, ही शोकांतिका आहे. सरकारने असंवेदनशीलपणे वागत असून जर सरकारने तातडीने पंचनामे करून १००% नुकसान भरपाई दिली नाही तर नुकसानग्रस्तांना घेवून आक्रमक आंदोलन करू, असा इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे.