चंदनतस्करी प्रकरणी ताब्यातील आरोपीला सुनावली वन कोठडी

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी| तालुक्यातील पाटणाच्या जंगलात चंदनाच्या झाडाची तस्करी करणाऱ्या टोळीतील एका संशयित आरोपीला वन्यजीव विभागाने ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता त्याला ४ दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, डी. के. जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव- प्रभारी) चाळीसगाव हे आपल्या वन कर्मचाऱ्यांसह २ सप्टेंबर रोजी सायंकाळी नियतक्षेत्र पाटणा यामधील राखीव वनकक्ष क्रमांक – ३०५ मध्ये जंगल भागात गस्त घालीत होते . अशातच त्यांना डोंगरी नदीच्या वरील भागात अज्ञात इसम असल्याचा भास झाला. आणि मग त्यादिशेने पाठलाग केला. तर चंदनतस्करी करणाऱ्या तिघांपैकी एक इसम मिळून आला.

सदर इसमाचे नाव विचारले असता सखाराम श्रावण गावंडे रा. अबांना ठाकूरवाडी ता. कन्नड जि. छत्रपती संभाजीनगर असल्याचे सांगितले. दरम्यान त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील दोन कुऱ्हाड, करवत, नायलानची पिशवी व इतर साहित्य हस्तगत केले. त्यानंतर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान डि.के. जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव- प्रभारी) चाळीसगाव यांनी सदर आरोपीस मा. न्यायदंडाधिकारी वर्ग-१ चाळीकगांव याचे न्यायालयासमोर हजर केले असता, आरोपीला चार दिवसांची’ वन कोठडी सुनावण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

सदर कार्यवाही एम. बी. नाईकवाडी विभागिय वनाधिकारी (वन्यजीव) विभाग, संभाजीनगर, काकड सहायक वनसंरक्षक (वन्यजीव) प्रभारी, अभय अटकळ, राजेश ठोंबरे मानद वन्यजीव रक्षक चाळीसगाव यांच्या मार्गदर्शनाखाली डी. के. जाधव वनपाल (प्रभारी- वनपरिक्षेत्र अधिकारी, चाळीसगाव), आर.जी. तडवी वनरक्षक पाटणा, ए.बी.मोरे विशेष वनरक्षक पाटणा, घु.आर.सोनवणे पाटणा, तसेच रोजंदारी संरक्षण वनमजूर रमेश राठोड, राजाराम चव्हाण, वाल्मिक तलवारे व वाहन चालक बापू आगोणे आदींनी केली आहे.

Protected Content