‘त्या’ पशु पालकाला तात्काळ भरपाई देण्यात यावी – रोहिणी खडसे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वादळामुळे सात शेळ्या दगावलेल्या पशुपालकाला नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी रोहिणीताई खडसे यांनी केली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, गेल्या दोन दिवसांपासुन मुक्ताईनगर तालुक्यात वादळी वारा आणि अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. तापमानाचा पारा ४५ अंशा पर्यंत गेलेला असताना अचानक आलेल्या वादळी वारा आणि अवकाळी पावसाने तालुक्यात शेती, घरे गोठयांचे मोठे नुकसान झाले आहे.

मार्च महिन्यात झालेले वादळ आणि एप्रिल मे महिन्यातील उष्ण तापमानामुळे झालेल्या केळी बागांच्या नुकसानीतुन शेतकरी सावरत असताना आता आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे कापणीला आलेल्या हजारो हेक्टर वरील केळी बागा भुईसपाट होऊन शेतकर्‍यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यातच काल रविवार संध्याकाळी कुर्‍हा काकोडा परिसरात आलेल्या चक्रीवादळ आणि अवकाळी पावसात बोरखेडा येथे विज कोसळून हिरामण मदने या पशुपालकाच्या सात शेळ्यांचा मृत्यु झाला आहे. पशुधनाच्या मृत्यूने हिरामण मदने यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या अनुषंगाने आज सोमवार रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी बोरखेडा येथे घटनास्थळी भेट देऊन हिरामण मदने यांना धिर दिला व मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या सोबत भ्रमणध्वनी वरून संपर्क साधुन पशुशल्य चिकित्सक यांना मृत शेळ्यांचा पंचनामा करून शवविच्छेदन करण्या विषयी सुचना देणेबाबत आणि हिरामण मदने यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा केली. यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या मुक्ताईनगर, बोदवड, रावेर तालुक्यात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये घरांचे गोठयांचे शेतीची मोठ्या प्रमाणावर हानी झालेली आहे. विशेषतः केळी बागा जमिनदोस्त झाल्याने केळी उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे
या नुकसानीचे पंचनामे करून आचारसंहिता बाजूला ठेऊन नुकसान ग्रस्तांना तात्काळ मदत मिळवून देण्याविषयी जळगाव जिल्हाधिकारी यांच्या सोबत काल चर्चा झाली. कोणताही पशुपालक हा आपल्या घरातील सदस्या प्रमाणे आपल्या जनावरांची काळजी घेत असतो.

विज कोसळून हिरामण मदने यांच्या शेळ्या दगावल्याने त्यांच्यावर संकट कोसळले असुन त्यांचे नुकसान झाले आहे याबाबत मुक्ताईनगर तहसीलदार यांच्या सोबत कृषी अधिकारी व पशु शल्य चिकित्सकांना मृत पशुधनाचे पंचनामे करून शवविच्छेदन करण्या बाबत सुचना करण्या विषयी चर्चा केल्याची व हिरामण मदने यांना नैसर्गिक आपत्ती निधीतून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले

यावेळी माजी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटिल, कुर्‍हा सरपंच डॉ बी. सी. महाजन, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष शिवा पाटिल, संतोष चव्हाण, उपसरपंच भरत मदने, मनोज हिवरकर, राजू खोले, शिवराम मदने उपस्थित होते.

Protected Content