मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राजकारणातील कटुता संपावी या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचे समर्थन करतांनाच शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांना आज पुन्हा एकदा खडे बोल सुनावले आहेत.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनातून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सहमती दर्शवितांनाच त्यांना खडे बोल सुनावण्यात आले आहेत. या अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात कधी नव्हे एवढी कटुता आली आहे, हे नाकारता येणार नाही, असे फडणवीस यांनी कबूल केले. महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त कटुता नव्हे तर सूडाच्या राजकारणाचे विषारी प्रवाह उसळत आहेत व या प्रवाहाचे मूळ भाजपच्या अलीकडच्या राजकारणात आहे. पण त्याबाबत फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांना आता खंत वाटू लागली असेल तर त्या विषाचे अमृत करण्याचे कामही त्यांनाच करावे लागेल, असा सल्ला देण्यात आला आहे.
यात पुढे म्हटले आहे की, ही कटुता कशी कमी करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे.’ फडणवीस यांनी हे सांगावे हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. महाराष्ट्रात कटुता का व कोणी निर्माण केली? महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षात तीन सत्तांत्तरे झाली. त्यातील दोन सत्तांतरे थेट फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाली आहेत. हा दुटप्पीपणा चांगला नाही. प्रामाणिकपणाने बोलत आहात तर त्यात गल्लत का करता?, अशी विचारणा ठाकरे गटाने केली आहे. बेरजेचे राजकारण हीच महाराष्ट्राची परंपरा आहे. यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार अशा नेत्यांनी हे बेरजेचे राजकारण केले, ते मोडले कोणी? राजकारणात व्यक्तिगत चिखलफेक करताना कोणतेही धरबंध आता बाळगले जात नाहीत व त्यासाठी भाजपने काही भुंकणार्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिले असल्याची घणाघाती टीका यात करण्यात आली आहे.
यात शेवटी नमूद केले आहे की, खरी शिवसेना कोणती? हे फडणवीसांना पक्के माहीत आहे व त्यांनी गळयात जो ‘खरी शिवसेना’ म्हणून धोंडा बांधून घेतला आहे तो महाराष्ट्राला घेऊन बुडणार आहे, हे समजण्याइतके फडणवीस सुज्ञ आहेत. पण त्यांचे शहाणपण कोठेतरी भरकटल्यासारखे झाले आहे. फडणवीस हे ‘सागर’ बंगल्यावर खूश आहेत. गेल्यावेळी भाजपने शब्द पाळला असता तर तेच आज ‘वर्षा’वर असते व आम्ही एका नात्याने त्यांच्याकडे फराळास गेलो असतो. असो. उद्या काय होईल असे जर-तर वगैरे राजकारणात चालत नाही. पण महाराष्ट्राची एकोप्याची परंपरा कायम राहावी या फडणवीसांच्या मताशी आम्ही सहमत आहोत, असे या अग्रलेखात म्हटले आहे.