


मुंबई, वृत्तसेवा । महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संदर्भात मोठी खळबळजनक माहिती समोर आली आहे. ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने उद्या होणारी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो परीक्षार्थींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्यातील सुमारे २ लाख २६ हजार शिक्षक उमेदवारांनी तयारी केली होती. मात्र परीक्षा होण्याच्या आधीच प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आल्याने परीक्षा रद्द करण्यात आली आहे. आता अधिकृत परिपत्रक काढून परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली जाणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने तातडीने निर्णय घेत परीक्षा पुढे ढकलली आहे. शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली ही पात्रता परीक्षा असल्याने लाखो उमेदवारांचे भवितव्य या परीक्षेशी जोडलेले आहे. त्यामुळे पेपरफुटीच्या प्रकारामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, या पेपरफुटीच्या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “या सरकारला साधा TET चा पेपरही सांभाळता येत नाही. नीट परीक्षेतील पेपरफुटीनंतरही पुन्हा TET चा पेपर फुटतो, याचा अर्थ सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होते,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांची पात्रता ठरविणाऱ्या परीक्षेतील पेपरफुटी हा गंभीर प्रकार असल्याचे सांगत अंबादास दानवे यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. “गुड गव्हर्नन्स आणि झिरो टॉलरन्सच्या घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी दूर होत नाहीत,” असा आरोप त्यांनी केला.
पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे. परीक्षा रद्द झाल्याने उमेदवारांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान झाले असून, नवीन परीक्षा तारीख लवकर जाहीर करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ठाण्यात TET परीक्षेचा पेपर फुटल्याने महाराष्ट्रातील शिक्षक पात्रता परीक्षा रद्द करण्यात आली असून, २ लाख २६ हजार उमेदवारांना नवीन तारखेची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या प्रकरणामुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.



