Home क्राईम पाचोऱ्यातील इसमाचा टोकाचा निर्णय ; डॉक्टरांविरोधात गुन्ह्याची मागणी

पाचोऱ्यातील इसमाचा टोकाचा निर्णय ; डॉक्टरांविरोधात गुन्ह्याची मागणी

0
11


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोऱ्यातील संभाजीनगर परिसरातील रहिवासी रवींद्र उर्फ रवी महाजन यांनी नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमधील आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले असून, संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाईक व समाजबांधवांकडून करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र महाजन आणि संभाजीनगर येथील डॉ. समाधान पाटील यांच्यात आर्थिक व्यवहाराच्या कारणावरून वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे. २६ जून रोजी रात्री संबंधित रुग्णालयात दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली असून, यावेळी दोघांमध्ये झटापट झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर रवींद्र महाजन यांनी सोशल मीडियावर आत्महत्या करण्याबाबतचा व्हिडिओ पोस्ट केल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी नगरदेवळा रेल्वे स्थानक परिसर गाठला. नगरदेवळा ते पाचोरा रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे किलोमीटर क्रमांक ३५४/१०/१२ जवळ त्यांनी धावत्या रेल्वेसमोर झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली.

घटनेची माहिती मिळताच परिसरात खळबळ उडाली. प्राथमिक माहितीच्या आधारे भडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून संबंधित रेल्वे परिसर चाळीसगाव रेल्वे पोलीस (जीआरपी) यांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने पुढील कायदेशीर प्रक्रिया त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओमध्ये रवींद्र महाजन यांनी आपल्या मृत्यूसाठी डॉ. समाधान पाटील यांना जबाबदार धरल्याचा आरोप केल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडिओच्या आधारे संबंधित डॉक्टरांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मयताच्या कुटुंबीयांसह समाजबांधवांनी केली होती. दरम्यान, या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात डॉ. समाधान पाटील यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉ. समाधान पाटील फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.

रवींद्र महाजन यांच्या आत्महत्येच्या घटनेने पाचोऱ्यात हळहळ व्यक्त होत असून, सोशल मीडियावरील व्हिडिओ, आर्थिक व्यवहाराचा वाद आणि त्यानंतर घडलेल्या घटनांची सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची मागणी होत आहे. नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ रवी महाजन यांच्या आत्महत्येनंतर व्हिडिओतील आरोपांच्या आधारे डॉ. समाधान पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


Protected Content

Play sound