चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील भोसर शिवारातील महामार्गावर भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दोन मित्र जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २० जून रोजी सकाळी १० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ट्रकवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास छगन बागूल (वय ४४) व अंकुश काशिनाथ गायकवाड (वय ३५) दोन्ही रा. चिंचगव्हाण ता. चाळीसगाव असे मयत दोन्ही मित्रांची नावे आहेत.
याबाबत अधिक असे की, विलास बागुल आणि अंकुश गायकवाड हे चिंचगव्हाण गावात वास्तव्याला होते. दोन्ही जिगरी मित्र म्हणून गावात ओळख होती. बुधवारी १९ जून रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास दोघेजण दुचाकी क्रमांक (एमएच १५ डीटी ५७८८ ) ने सांगवी ता. चाळीसगाव येथे कामाच्या निमित्ताने जात होते. दरम्यान, चाळीसगाव तालुक्यातील भोसर शिवारातील महामार्गारून दोघेजण जात असतांना मागून भरधाव वेगाने येणारा ट्रक क्रमांक (एचआर ६२ ए १०८३ ) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती, की दुचाकीवरील विलास बागूल व अंकुश गायकवाड हे दूरवर फेकले जाऊन यांना जबर मार लागल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रक चालक पसार झाला. याप्रकरणी गुरूवारी २० जून रोजी सकाळी १० वाजता मयत विलास बागुल यांचे चुलत भाऊ मुरलीधर बागूल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालकाविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. तापास हवालदार पोहेकॉ विजय शिंदे करीत आहेत.