जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात सोमवारी १७ मार्च दुपारी ३ वाजता मोठा तणाव निर्माण झाला होता. वाल्मीक नगरातील मुलाच्या अपहरण प्रकरणातील संशयित आरोपी प्रवीण कोळीने धार्मिक स्थळाजवळ पाण्याची टाकी आणि माठाची तोडफोड केल्यामुळे त्याला अटक करण्यात आली होती. न्यायालयात कोठडीऐवजी जामीन मिळणार असल्याची चर्चा पसरताच मोठा जमाव न्यायालय परिसरात जमला होता. कोर्टाबाहेर किरकोळ घोषणाबाजी देखील करण्यात आली.
प्रवीण कोळीवर हल्ला होऊ शकतो, हे लक्षात येताच पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवला. न्यायालय परिसरात तीन दंगा नियंत्रण पथके आणि एक क्यूआरटी पथक पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून जमावाला शांत केले आणि कोर्ट परिसरापासून लांबपर्यंत पांगवले. अखेर न्यायालयाने प्रवीण कोळीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर परिसरातील तणाव निवळला. परंतु या घटनेमुळे काही वेळ कोर्ट परिसरात मोठ्या तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान नागरीकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवून नये असे आवाहन सहाय्यक पोलीस अधिक्षक संदीप गावीत यांनी केले आहे.