मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारनं निर्णयांचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल ४० निर्णय घेण्यात आले. सरपंच, उपसरपंचांनंतर आता कोतवाल आणि ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.
नव्या निर्णयानुसार, राज्यातील कोतवालांच्या मानधनत दहा टक्के वाढ करण्यात येणार आहे. तसंच, कोतवाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू करण्यासही मंजुरी देण्यात आली. राज्यातील १२ हजार ७९३ कोतवालांना याचा लाभ मिळणार आहे. त्यांना सध्या मिळणाऱ्या १५ हजार रुपये मानधनात ही वाढ देण्यात येईल. सेवेत असताना मृत्यू झाल्यास किंवा गंभीर आजार, अपघात यामुळे असमर्थ ठरल्यास शासनाच्या अनुकंपा धोरणानुसार त्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यासही मंजुरी देण्यात आली.