मुंबई (वृत्तसंस्था) नागपूर अधिवेशन तोंडावर आलं आहे, अद्याप नव्या मंत्रीमंडळाचे खातेवाटप झालेले नाही, त्यामुळे अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षांच्या आणि राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर उत्तरं कोण देणार? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विचारला होता. त्यामुळे तूर्तास हिवाळी अधिवेशनाला सामोरे जाण्यापूर्वी 6 मंत्र्यांमध्येच खाते वाटप होणार आहे.
हिवाळी अधिवेशनासाठी महाराष्ट्र विकास आघाडीने तात्पुरते खातेवाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हिवाळी अधिवेशनाआधी सहा मंत्र्यांमध्ये खातेवाटप होणार आहे. प्रत्येक मंत्र्याकडे चार खाती सोपवली जातील, तर उर्वरीत खात्यांचा भार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असेल. यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून राजभवनला खाते वाटपासाठी राज्यपालांकडे यादी सुपूर्द करण्यात आली आहे. आज खाते वाटपाच्या यादीवर राज्यपालांची स्वाक्षरी होऊन संध्याकाळपर्यंत अधिसूचना निघणार आहे. विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. तर या महिन्याच्या अखेरीस ठाकरे सरकारचा विस्तार होईल, असे बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटपासाठी सर्व महाविकास आघाडीच्या आमदारांना आणि राज्यातील जनतेला अजून 15 ते 16 दिवसांची वाट पाहावी लागणार आहे.