गोपीनाथगडावर नाथाभाऊंचे पक्षांतराचे स्पष्ट संकेत

khadse e1550572684596
बीड प्रतिनिधी । गोपीनाथराव मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात बोलतांना माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपण स्वतंत्र वाट चोखाळणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले.

आज गोपीनाथगडावर अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार प्रीतम मुंडे-पालवे, पंकजा मुंडे, प्रकाश धस, नमीत मुंदडा आदींसह अन्य मान्यवर उपस्थित होते. यात एकनाथराव खडसे यांनी जोरदार टोलेबाजी केली. ते म्हणाले की, शेठजी-भटजींचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या भाजपला गोपीनाथ मुंडे यांनी बहुजन चेहरा प्रदान केला. त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, विविध समाजांना जोडले आणि यातूनच भाजपला आजचा दिवस पाहता आला. मात्र गोपीनाथरावांच्या मार्गात अनेकदा संकटे उभी करण्यात आली. आणि नंतर हेच काम त्यांच्या कन्येबाबतही करण्यात आले आहे. याचमुळे पंकजा यांना पराभूत व्हावे लागले.

खडसे पुढे म्हणाले की, मी स्वत: चार दशकांपासून गोपीनाथ मुंडे यांचा संघर्ष पाहिला. यानंतर त्यांच्या सोबत संघर्षात सहभागी झालो. आम्ही कष्ट करून पक्ष वाढविला. मात्र याचे फळ म्हणजे आपल्याला कोणताही आरोप नसतांना पदाचा त्याग करावा लागला. यासाठी कोणतेही स्पष्ट कारण देण्यात आले नाही. याप्रसंगी गोपीनाथरावांच्या आठवणी सांगतांना नाथाभाऊंना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले की, असा अपमान सहन करण्यापेक्षा काही तरी ठाम निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे ते म्हणाले. पंकजा यांनी दुसरा विचार केला तरी आपला विचार पक्का असल्याचे खडसे म्हणाले. यामुळे त्यांनी एका अर्थाने पक्षांतराचे स्पष्ट संकेत दिल्याचे दिसून आले आहे.

Protected Content