मुंबई प्रतिनिधी । पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या अंडर १९ वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा अखिल भारतीय कनिष्ठ निवड समितीकडून आज करण्यात आली असून भारतीय संघासमोर विश्वविजेतेपद कायम राखण्याचे आव्हान आहे. दि.१७ जानेवारी ते ९ फेब्रुवारी या दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे.
१६ संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. चार गटांत ही स्पर्धा होईल. भारतीय संघाचं नेतृत्व प्रियम गर्गकडे सोपवण्यात आले आहे. या संघात मुंबईच्या यशस्वी जयस्वाल, अथर्व अंकोलेकर आणि दिव्यांश सक्सेना यांना संधी दिली आहे. भारतीय संघ अ गटात खेळणार आहे. त्यात पहिल्यांदा पात्र ठरलेल्या जपानसह न्यूझीलंड, श्रीलंका या संघांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर लीग फेरीसाठी पात्र ठरतील.
भारतीय संघाने चार वेळा अंडर १९ वर्ल्डकप स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. २०१८मध्ये अंडर १९ वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारतानं ऑस्ट्रेलियावर आठ विकेट राखून विजय मिळवला होता. या स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य ठरला होता. निवड समितीने भारतीय संघाची धुरा १९ वर्षीय प्रियम गर्गकडे सोपवली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने द्विशतक आणि शतक झळकावले आहे. भारत क संघाचं त्यानं प्रतिनिधीत्व केलं आहे. हा संघ देवधर करंडक स्पर्धेचा उपविजेता ठरला होता. गेल्या गेल्याच महिन्यात भारत ब संघाविरुद्ध अंतिम सामन्यात ७४ धावांची तुफानी खेळी केली होती.