अँटिग्वा वृत्तसंस्था । ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात या 120 गुणांसाठीची शर्यत आजपासून सुरू होणार आहे. येथील सर व्हिव्हियन रिचर्ड स्टेडियमवर आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.
याबाबत माहिती अशी की, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकाही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसोटीचा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार आहे. कसोटी वर्ल्ड कप स्पर्धेत प्रत्येक मालिकेला 120 गुण दिले जाणार आहेत आणि त्यात सर्वाधिक गुण मिळवणारा संघ गुणतालिकेत आगेकूच करत राहणार आहे. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला अॅशेस मालिकेतून सुरुवात झाली. पण, भारतीय संघ या स्पर्धेतील पहिला सामना उद्यापासून खेळणार आहे. 2 वर्ष चालणाऱ्या या स्पर्धेत अव्वल 9 संघांमध्ये एकूण 27 कसोटी मालिकेत 72 सामने होणार आहेत आणि त्यानंतर अव्वल दोन संघांमध्या जेतेपदाचा सामना होणार आहे. अव्वल दोन संघांमध्ये जून 2021मध्ये लंडन येथे जेतेपदाचा सामना होईला आणि विजेत्या संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान मिळेल. या स्पर्धेतील भारतीय मोहिमची सुरुवात आजपासून होत आहे.