पाचोरा, प्रतिनिधी । कोविड महामारीत शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांना उपस्थिती सक्तीची करू नये असे निर्देश शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांनी शिक्षकसेनेच्या पाठपुराव्यानंतर शिक्षणाधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिले आहेत.
कोविड महामारीचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने दि.३० एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषीत केला असून कलम १४४ अन्वये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. याकाळात शाळा, महाविदयालये बंद ठेवाव्यात, असे निर्देश देण्यात आले होते. मात्र शिक्षक उपस्थितीबाबत स्पष्ट आदेश नसल्याने संभ्रम होता. याबाबत शिक्षकसेनेने पाठपुरावा करून स्पष्ट आदेश काढण्याची विनंती केली होती.
त्यानुसार शिक्षण उपसंचालक, नाशिक यांनी जळगांव, धुळे, नाशिक, नंदुरबार जिल्हयाच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना पत्र काढून लॉकडाऊन काळात शिक्षक उपस्थितीची सक्ती न करण्याचे निर्देश दिले आहेत. शिक्षकसेनेचे पदाधिकारी नरेंद्र सपकाळे, संदीप पवार, नाना पाटील, सुनिल चौधरी, राधेशाम पाटील, राजेश जाधव यांनी शिक्षण उपसंचालक यांचे आभार मानले आहेत.