चाळीसगाव (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील शासकीय कार्यालयातील कर्मचारी, शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांना इव्हीएम- व्हीव्हीपॅट यंत्र कसे वापरण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण निवडणूक कार्यालयाकडून येथील हंस टॉकीजमध्ये देण्यात आले. हे प्रशिक्षण दिनांक 27 व 28 फेब्रुवारी या दोन दिवसातील पाच सत्रात पूर्ण करण्यात आले.
या प्रशिक्षणास नायब तहसिलदार नानासाहेब आगळे निवडणूक नायब तहसिलदार डी. एस. भालेराव उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतांना (१७) चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी सांगितले की, आगामी निवडणूकीच्या काळात इव्हीएम यंत्राबाबतचे सर्व गैरसमज दूर करुन मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी इव्हीएम यंत्रासोबत व्हीव्हीपॅट यंत्रही जोडले आहे. त्यामुळे आता मतदाराला आपले मत कुणाला गेले याबाबत खात्री करता येणार आहे. यापूर्वी इव्हीएम मशिनद्वारे मतदान केल्यानंतर मतदाराला फक्त बीफ आवाज ऐकायला येत होता. आता मात्र मतदाराने कोणाला मतदान केले हे व्हीव्हीपॅट यंत्रावर सात सेकंदापर्यंत दिसणार आहे. यानंतर मतदानाची चिठ्ठी यंत्रामध्ये खाली पडल्यानंतर इव्हीएम यंत्रावर बीफ आवाज येवून मतदान पूर्ण होईल. एखाद्या मतदारास यानंतरही काही आक्षेप असल्यास परवानगी घेवून शहानिशा करता येणार आहे. परंतू त्याने केलेली तक्रार खोटी निघाल्यास त्यास तीन महिन्यांपर्यंत शिक्षेची तरतुदही करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रशिक्षणात कर्मचाऱ्यांना व्हीव्हीपॅट यंत्र इव्हीएम यंत्राला कसे जोडावे. यंत्र सुरु झाल्यानंतर कोणती कार्यवाही करावी, त्यात येणाऱ्या अडचणी, यंत्राची मतदान केंद्रावर नेतांना व मतदान केंद्रात कोणती काळजी घ्यावी, काही दोष उदभवल्यास काय करावे याबाबत (१७) चाळीसगाव विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रोजेक्टरद्वारे माहिती देण्यात येत होती. दोन दिवशीय व पाच सत्रात पूर्ण झालेल्या प्रशिक्षणात शहरातील 2 हजार 600 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले.