भारत मिसाईल डागण्याच्या तयारीत;पाकिस्तानचा कांगावा

BrahMos Missile India MTCR 1600x900

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारताने चहूबाजूंनी कोंडी करण्यास सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानने नवा कांगावा सुरू केला आहे. भारत पाकिस्तानवर मिसाईल डागण्याच्या तयारीत असल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला आहे. भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची खोटी माहिती पाकिस्तानकडून अनेक देशांना दिली जात आहे. पाकिस्तानने त्यांचे विमानतळ बंद ठेवले आहेत. भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनं आपण विमानतळ बंद ठेवले असल्याचा कांगावाही पाकिस्तानकडून केला जात आहे.

 

भारतीय हवाई दलाने दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. त्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाने भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या कारवाईला भारतानं चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्ताननं जगभरात अफवा पसरवण्यास सुरुवात केली आहे की, ‘भारत मिसाईल डागण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळेच आम्ही देशातले विमानतळ बंद ठेवले आहेत.’ विशेष म्हणजे पाकिस्ताननं थेट इतर देशांच्या संरक्षण दलातील प्रमुख अधिकाऱ्यांना फोन करुन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. भारत युद्धाच्या तयारीत असल्याची खोटी माहिती जगभरात पोहोचावी, यासाठी पाकिस्तानची धडपड सुरू आहे.

 

भारत मिसाईल टाकण्याच्या प्रयत्नात असल्याची खोटी माहिती पाकिस्तानकडून पसरवली जात आहे. याशिवाय भारतीय नौदलासंदर्भातही पाकिस्ताननं अफवा पसरवल्या आहेत. विशेष म्हणजे पाकिस्ताननं पी-५ देशांना ही माहिती दिली. पी-५ मध्ये चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन, अमेरिका यांचा समावेश होतो. यापैकी तीन देशांनी (फ्रान्स, ब्रिटन, अमेरिका) जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अजहरवर बंदी घालण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे प्रस्ताव दिला आहे. या तीनही देशांकडे नकाराधिकार असल्याने त्यांना विशेष महत्त्व आहे.

Add Comment

Protected Content