लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी कर कमी केल्यानंतर राज्य सरकारने अनुकमे २.०८ आणि १.४४ पैसे व्हॅटचा कर कागदोपत्री कमी केला. परंतु महागाईने त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी दारूप्रमाणेच इंधनावर देखील ५० टक्के कर कमी करावा, अशी मागणी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पत्रकार परिषदेत केली.
केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यात दुसऱ्या वेळेस इंधनावरील अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल डिझेलचे दर ८ ते १० रुपयांनी कमी झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केवळ दीड ते दोन रुपये मुल्यावर्धीत (व्हॅट) करात कपात केली. राज्यात एक लिटर पेट्रोलवर ३२.५५ पैसे तर डिझेलवर २२.३७ पैसे इतका कर आहे. केंद्र सरकारने कर कपात केल्यानंतर आवाहन करूनही राज्य सरकारने कर कमी केले नाहीत.
केवळ केंद्र सरकारच्या इर्षेपोटी अनावश्यक वादाचे राजकारण सुरु केले आहे. एकीकडे महागाईच्या नावावर सत्ताधाऱ्यांनीच निदर्शने करायची आणि कर कपात न करता जनतेची लुट करायची असा दुटप्पी खेळ महाविकास आघाडी सरकार करीत असल्याचा आरोप भाजपचे केशव उपाध्ये यांनी केला आहे.
ठाकरे सरकारने इंधना मुल्यावर्धीत कर कमी केल्यास जनतेला दिलासा मिळेल हे माहित असूनही पेट्रोल डिझेलवर केवळ दीड ते दोन रुपये मुल्यावर्धीत (व्हॅट) करात कपात केली. विदेशी दारू वरील कर ५० टक्के कमी करत दारू उत्पादकांना दिलासा देत मलिदा दिला, त्याप्रमाणेच पेट्रोल डिझेलवर मुल्यावर्धीत (व्हॅट) कर ५० टक्के कपात केल्यास सर्वसाधारण जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी उपाध्ये यांनी केली.
कर कपात केल्याचे गाजर जनतेला दाखवले असून स्वताची पाठ थोपटून घेतली आहे. या कर कपातीतून जनतेला कोणताच लाभ प्रत्यक्षात मिळणार नसून केवळ कर कपात हा देखावा आहे. जनतेला दिलासा द्यावा हि इच्छाशक्ती नसल्याने त्यासंबंधीत अधिकुत आदेश देखील ठाकरे सरकारने दिलेला नाही अशी टीकाही त्यांनी केली.