नवी दिल्ली । नवीन संसद बांधण्याचे कंत्राट विख्यात टाटा समूहाला मिळाले असून स्पर्धेतील एल अँड टी कंपनीपेक्षा चांगली ऑफर केल्याने त्यांना हे काम देण्यात आल्याचे आज जाहीर करण्यात आले आहे.
केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने आज नव्या संसद भवनाच्या बांधकाम कंत्राटाच्या बोलीसंदर्भातील माहिती खुली केली. नवीन संसदेच्या इमारतीचे निर्माण कार्य टाटा ग्रुपला मिळणार आहे. टाटा प्रोजेक्टने नवीन संसदेच्या बांधकामाचे कंत्राट ८६१.९० कोटी रुपयाला मिळवले आहे. त्यांनी या बोलीत लार्सन अँड टर्बो कंपनीला मागे टाकले. लार्सन अँड टर्बोने ८६५ कोटींची बोली लावली होती.
हा प्रकल्प एका वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. सरकारी संस्थेने या प्रकल्पाची अंदाजे किंमत ९४० कोटी इतकी वर्तवली होती. संसदेची ही नवी इमारत त्रिकोणी आकाराची असणार आहे. सध्याच्या संसदेची इमारत ब्रिटीश काळात बांधण्यात आली होती. ती वर्तुळाकार आकाराची आहे.