भुसावळ प्रतिनिधी । गेल्यावर्षी ब्राझील, रशिया, मेक्सिको, इराण, चीन, दक्षिण कोरिया या संघांना नमवत भुसावळातील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघ विजेता ठरला होता. आयआयटीने नेमलेल्या आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी श्री संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या संघाला प्रथम मानांकन देऊन गौरविले आहे. मानांकन जाहीर होताच बुधवारी ११ सप्टेंबर रोजी कॉलेजमध्ये जंगी सत्कार करण्यात आला.
हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधूलता शर्मा, कोषाध्यक्ष ॲड. एम. डी. तिवारी, रमेश नागराणी, सत्यनारायण गोडयाले, पंकज संड व समस्त पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. पुष्पेन्द्र सिंह पटेल, अविनाश बनसोडे, अक्षय भंगाळे, अतिश यादव, परेश पाटिल, तुषार बऱ्हाटे, सौरभ मित्रा, शुभम सनांन्से, जुड गावंडे यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह, अकडेमीक डीन डॉ.राहुल बारजिभे, प्रा.अविनाश पाटील, प्रा.गिरीश भोळे, प्रा. गिरीश सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संशोधक वृत्ती आणि नवनवीन कल्पनांना चालना देण्यासाठी मुंबई आयआयटीमध्ये दरवर्षी ‘टेकफेस्ट’ मेळावा होतो. या मेळाव्यात भुसावळातील संत गाडगेबाबा अभियांत्रिकीचा सहभाग सातत्याने वाढता आहे. मेळाव्यात महाविद्यालयाने तयार केलेल्या गज साय बोर्ग संघाचा “बोस” प्रथम तर “भगत” पाचव्या स्थानाचा मानकरी ठरला आहे. याच महाविद्यालयाचा ब्लँका बोट्झ संघाचा “तानाजी” चौथ्या स्थानाचा मानकरी ठरला. पहिल्या पाच रोबोट मध्ये संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या तीन रोबोटला मानांकन मिळाल्याने महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.
तांत्रिक कौशल्य आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध: डॉ. आर.पी. सिंह
आशिया खंडात इंजिनीअरिंग महाविद्यालयांसाठी मानाची मानली जाणाऱ्या ‘आयआयटी टेकफेस्ट’मध्ये वर्षभर तगड्या स्पर्धकांना आव्हान देत, तांत्रिक कौशल्य आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध केले आहे. भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरही दबदबा कायम राखला असे गौरवोद्गार डॉ. आर.पी. सिंह केले.
यंदा पुन्हा भुसावळचा झेंडा फडकवू
आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल फेस्टिव्हल अशी ओळख असलेल्या आयआयटी ‘टेकफेस्ट’चं बिगुल वाजलंय. यंदा ३ ते ५ जानेवारीदरम्यान आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये टेकफेस्ट रंगणार आहे. मागील वर्षी प्रमाणे अव्वल ठरायचेच या ध्येयाने दोन महिन्यांपासून तहान-भूक विसरुन केलेल्या प्रयत्नांच्या जोरावर ‘आयआयटी टेकफेस्ट’मध्ये पुन्हा एकदा भुसावळाचा झेंडा फडकवु असा विश्वास संघ नायक अविनाश बनसोडे याने दाखवला आहे.