वरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील तापी नदीने रौद्ररूप धारण केले असून नदीवर असणाऱ्या हतनुर धरणाचे पूर्ण दरवाजे म्हणजेच ४१ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहेत.
भुसावळ तालुक्यातील हतनुर धरण हे तापी नदी वरती बांधण्यात आले असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सातत्याने सुरू असल्याने हतनुर धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे. त्यामुळे धरणातून आज सकाळी सात वाजल्यापासून धरणाचे पूर्ण 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहेत. नदीपात्रामध्ये 2,44,485 क्यूसेक्सने पाणी प्रवाह सोडण्यात येत असल्यामुळे तापी नदीने रौद्ररूप धारण केले असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. कोणीही नदी पात्रात उतरू नये किंवा गुरेढोरे नदीपात्रात सोडू नये, असे आवाहनही प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.