चोपडा, प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या तापी नादीचा आज (दि ८ जुलै) जन्मदिवस आहे. तालुक्यातील निमगव्हाण येथे तापी काठावर असलेल्या दादाजी धूनीवाले मठात दरवर्षीप्रमाणे यंदाही तापी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुका व आसपासच्या गावातून हजारो भाविकांनी यावेळी तापी नदीचे दर्शन घेतले.
यावेळी चोपडा तालुक्याचे माजी आमदार जगदीश वळवी यांनी दरवर्षीप्रमाणे तापी माई व दादाजी धूनीवाले बाबा यांच्यापुढे नतमस्तक होऊन चोपड़ा तालुका पर्जन्यवान होऊन सुखी, समृध्द व्हावा, तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, अबालवृद्ध, सुखी समाधानी रहावा, अशी प्रार्थना केली. तापी जन्मोत्सवानिमित्त आयोजित भंडाऱ्यात त्यांनी स्वतः भाविकांना पंगतीत प्रसाद वाढला. तदनंतर दादाजी धूनीवाले मठाच्या कार्यालयात जावून संचालक मंडळाशी चर्चा करून, आणखी काय सेवा करू शकतो, अशी विनंती केली. त्यावेळी संस्थानचे संस्थापक अध्यक्ष कस्तूरलाल भाटिया यांनी, २००९ साली आमदार असतांना मठासाठी आमदार निधीतुन १० लाख रूपये देवून सभामंडप, भंडारगृह बांधून दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी चर्चा करतांना जगदीश वळवी म्हणाले की, दादाजी धूनीवाले दरबार या मठाचा पर्यटनस्थळ म्हणून समावेश व्हावा, यासाठी मी प्रयत्न करेन. याप्रसंगी मठातील महंत, साधु, महाराज यांनी वळवी यशस्वी भव असा आशीष दिला. यावेळी संस्थानचे विश्वस्त राजेन्द्र भाटिया, धनराज पोपट पाटील, अरुण मूलचंद पाटील, केशव पाटील, संदीप पाटील, तसेच तांदलवाडी येथील राजेन्द्र भास्कर पाटील, वराडचे माजी सरपंच सुनील महाजन, पत्रकार शाम जाधव हे उपस्थित होते.