जळगाव प्रतिनिधी । नुसते सुंदर असून चालत नाही तर आपल्यात टॅलेंट असणे फार आवश्यक आहे. टॅलेंटच्या आधारे कोणतीही स्पर्धा आपण जिंकू शकतो, असे मत ‘मिस इंडिया मल्टीनॅशनल २०१९ ‘या स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या कु. तन्वी मल्हारा यांनी आज पत्रकार परिषदेत मांडले. यावेळी त्यांचे वडील आनंद मल्हारा आणि आई डॉ. नलिनी मल्हारा हे उपस्थित होते.
आपल्याला आलेल्या अडचणी व अनुभव याविषयी तन्वी यांनी सांगितले की, सुरूवातीपासूनच घरातून मिळालेल्या संस्कारातून मला दररोज नवनवीन धडे मिळत गेले, त्यात मला आई-वडिलांकडून नेहमी पाठबळ मिळाले. कोणत्याही चांगल्या गोष्टीकडे सकारात्मकरित्या बघण्याचा दृष्टीकोन ठेवून काम करायला हवे. यापुर्वीही मी मिस इंडिया मल्टीनॅशनल स्पर्धेसाठी प्रयत्न केले होते, दोन वेळा अयशस्वी झाल्यानंतर यावेळी हा शेवटचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यात यश आले. आपण सुंदर नाही याची कल्पना असतांना फक्त सौंदर्य महत्वाचे नसून आपल्यात बोलण्यात, वागण्यात, एक्सप्रेशन आणि टॅलेन्ट हे महत्वाचे आहे. याच जोरावर आपण ही स्पर्धा जिंकल्याची माहिती तन्वी मल्हारा यांनी दिली.
सौंदर्य आणि टॅलेंट यावर आधारित मिस इंटरनॅशनल, मिस मल्टीनॅशनल व मिस अर्थ या आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत निवड होण्यासाठी जयपूर येथे २९ रोजी पार पडलेल्या “ग्लॅमआनंद सुपर मॉडेल इंडिया” स्पर्धेत जळगावच्या तन्वी मल्हाराने मिस मल्टीनॅशनलचा किताब जिंकला. येत्या डिसेंबर माहिन्यात होणा-या मिस मल्टिनॅशनल स्पर्धेत तन्वी अन्य देशांच्या स्पर्धकांसोबत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
तन्वी यांना लहानपणापासून कॅमेऱ्याविषयी आकर्षण आणि पॅशन आहे. त्यांनी फॅशन स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे आणि मिस युनिव्हर्समध्ये विजेते होऊन भारताचा गौरव वाढवण्याचे लहानपणी पाहिलेले स्वप्न आज सत्यात उतरले आहे. वक्तृत्व चांगले असल्याने तन्वीने शाळेत असतांना गांधी या विषयावरच्या नॅशनल लेव्हलच्या स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला होता. त्यानंतर नाशिक येथे रेडीओ जॅकी म्हणून दोन वर्षे काम पाहिले. तिने ‘आँखे’ आणि ‘प्यार एक तर्फा-२’ अशा दोन शॉर्ट फिल्ममध्ये अभिनेत्री म्हणून कामही केले आहे.