मुंबई, वृत्तसंस्था | सत्ता स्थापन करण्याचे ठरल्यास महत्त्वाची पदे आणि सत्ता वाटपाबाबत आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये एकवाक्यता होईल, त्यानंतर शिवसेनेबरोबर बोलणी काय करायची ते ठरवले जाईल, अशी स्पष्ट माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे नेते अजित पवार यांनी आज (दि.१३) पत्रकारांशी बोलताना दिली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांनी अजून चर्चा सुरू केलेली नसून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात चर्चेची तारिख ठरवतील आणि त्यानंतर चर्चा सुरू होईल, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेअंती जे काही ठरेल, त्याबाबत काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील हायकमांडशी, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर पुढे शिवसेनेशी सत्ता स्थापनेबाबत चर्चा सुरू होईल, अशी माहितीही पवार यांनी यावेळी दिली.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पवार यांना प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी गाठले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आता लवकरात लवकर चर्चा सुरू करण्याची गरज असून दोन पक्षांमध्ये सत्ता वाटप कसे करावे, कोणती पदे कोणत्या पक्षाने घ्यावीत, त्यांनंतर किमान समान कार्यक्रम काय असावा, या कार्यक्रमात कोणते मुद्दे अंतर्भूत करावेत, ही चर्चा होईल. या सर्व मुदद्यांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये एकवाक्यता असणे अत्यंत गरजेचे आहे, असेही अजित पवार म्हणाले.
एकदा का सत्ता वाटपाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठरले की मग पुढे शिवसेनेशी चर्चा सुरू करता येईल, असे पवार म्हणाले. याचाच अर्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष शिवसेनेशी स्वतंत्र पक्ष म्हणून न बोलता, आघाडी म्हणूनच बोलतील, असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आघाडी म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो असल्याने सत्ता स्थापनेचा निर्णयही एकत्रित घेऊ, असेच दोन्ही पक्षांचे नेते निवडणूक निकालानंतर बोलत आले आहेत. दोन्ही पक्षांची हीच भूमिका पवार यांनी पुन्हा एकदा अधोरेखित करत आम्ही यापेक्षा कोणताही वेगळा विचार केला नसल्याचे आणि अजूनही कोणत्या अंतिम निर्णयापर्यंत आलो नसल्याचे स्पष्ट केले आहे.