जळगाव/पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । विकासोतून कर्ज घेण्यासाठी सातबारा उताऱ्यावर बोजा चढवण्याच्या मोबदल्यात १ हजारांची लाच घेणाऱ्या तलाठीसह एका खाजगी पेंटरला जळगाव लाच लुचपत विभागाच्या पथकाने पकडले आहे. या कारणामुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक गावात तक्रारदार हे आपल्या परिवाराचा वास्तव्याला असून कुटुंबियांच्या नावे त्यांचे लोणी बुद्रुक शिवारात शेत आहे. या शेतजमिनीवर तक्रारदार यांना गावातील विविध कार्यकारी सोसायटी मधून कर्ज घेण्यासाठी त्यांच्या शेतजमिनीवर असलेल्या सातबारा उताऱ्यावर बोजा लावणे आवश्यक होते. त्यामुळे तक्रारदार हे चोरवडी येथील तलाठी कार्यालयातील तलाठी सुभाष विठ्ठल वाघमारे वय-३४ रा. वर्धमान जैन, पारोळा यांच्याकडे गेले. त्यावेळी त्यांनी सांगितले की, तुमच्या व कुटुंबीयांच्या नावे असलेल्या शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा चढण्याच्या मोबदल्यात ४ उताऱ्यांचे प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे ८०० रुपये आणि मागील कामाचे दोनशे रुपये असे एकूण १ हजार रुपये द्यावे लागतील. त्यानुसार तक्रारदार यांनी याबाबत जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाकडे तक्रार दिली. दरम्यान पथकाने सोमवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचला. तक्रारदार कडून खाजगी पंटर शरद प्रल्हाद कोळी वय-४३ रा. चोरवड ता.पारोळा यांच्या फोनपेवर टाकण्यास सांगून लाच मिळविण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पथकाने दोघांना अटक केली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.