धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील धार येथील नारायण आनंदा पाटील यांनी १२ मे रोजी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यांना आत्महत्येला प्रवृत्त करणारे पाळधी येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश बुवा यांच्यावर कारवाई करा या मागणीसाठी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
त्यांनी अवैध धंद्याबाबत पोलिसांविरोधात तक्रार दिल्याने नारायण पाटील यांना पाळधी येथील सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश बुवा यांनी वेळावेळी शारिरीक, मानसिक व आर्थिकरित्या त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून नारायण पाटील यांनी आत्महत्या केली असून सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश बुवा यांच्यावर गुन्हा दाखल करुन कारवाई करावी या मागणीचे निवेदन तसेच तक्रार मयत नारायण पाटील यांच्या नातेवाईकांनी मंगळवार, १७ मे रोजी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक यांना दिले.
निता नारायण पाटील, विश्वास ओंकार बोरसे, राहूल नारायण पाटील यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. त्यात “नारायण पाटील यांनी अवैध धंद्यावर कारवाई होणेबाबतची तक्रार केली होती यावर कारवाई न होता उलटपक्षी पोलिसांनी त्यांना शारिरीक, मानसिक त्रास देवून पोलीस स्टेशनमध्ये अमानुषपणे मारहाण केली. यामुळे नारायण पाटील यांची प्रतिमा मलीन झाली. याच त्रासाला कंटाळून नारायण पाटील यांनी आत्महत्या केली. सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश बुवा यांनी त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे बुवा यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी निता नारायण पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले आहे. तसेच हे निवेदन विशेष पोलीस महानिरिक्षकांनाही पाठविण्यात आले असल्याचे निता नारायण पाटील यांनी बोलतांना सांगितले.
पोलीस हे कायद्याचे रक्षक असतात. मात्र तेच कायदा मोडत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागावी ? असा प्रश्न अशा घटनेकडे पाहून नागरिक उपस्थित करत आहे. पोलिसांवरील विश्वास अबाधित राहण्यासाठी अशा प्रकरणांना आळा बसून असे कृत्य करणाऱ्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.