Home आंतरराष्ट्रीय टी20 वर्ल्ड कप 2026 ; सुपर-8 मध्ये पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायदा...

टी20 वर्ल्ड कप 2026 ; सुपर-8 मध्ये पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायदा कोणत्या संघाला?


कोलंबो-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । टी20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील सुपर-8 फेरीला सुरुवात होत असतानाच पावसाचे ढग सामन्यांवर घोंगावत आहेत. विशेषत: कोलंबो येथे सतत पडणाऱ्या पावसामुळे पहिल्याच सामन्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत सामना पावसामुळे रद्द झाल्यास काय होईल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (ICC) नियम नेमके काय सांगतात, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

ICC Men’s T20 World Cup 2026 मधील सुपर-8 फेरीत भारत, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज, इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या आठ बलाढ्य संघांनी प्रवेश केला आहे. या संघांना दोन गटांत विभागण्यात आले असून प्रत्येक संघ तीन सामने खेळणार आहे. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. त्यामुळे सुपर-8 मधील प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

ग्रुप स्टेजप्रमाणेच सुपर-8 चे सामने भारत आणि श्रीलंकेत खेळवले जात आहेत. मात्र या फेरीसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. आयसीसीच्या नियमानुसार टी20 सामन्याचा निकाल लागण्यासाठी दोन्ही संघांना किमान पाच षटके फलंदाजी करणे आवश्यक असते. अंपायर आणि सामनाधिकारी कोणत्याही परिस्थितीत सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून निकाल लागू शकेल.

परंतु जर मुसळधार पावसामुळे पाच षटकांचाही खेळ होऊ शकला नाही, तर सामना रद्द घोषित केला जातो. अशा वेळी दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण दिला जातो. सामना अनिर्णित राहतो आणि कोणत्याही संघाला विजयाचे दोन गुण मिळत नाहीत. या परिस्थितीत नेट रनरेटवर थेट परिणाम होत नाही, मात्र विजयाची संधी गमावल्याने उपांत्य फेरीच्या शर्यतीत मोठा फटका बसू शकतो.

सुपर-8 फेरीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायचे असल्याने प्रत्येक सामन्याचे दोन गुण अत्यंत महत्त्वाचे ठरतात. पावसामुळे सामना वाया गेल्यास त्या संघाला विजयातून मिळणारे दोन गुण गमवावे लागतात, ज्यामुळे गुणतालिकेतील स्थानावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः ज्या संघांचा नेट रनरेट कमकुवत आहे किंवा स्पर्धा चुरशीची आहे, त्यांच्यासाठी हा तोटा निर्णायक ठरू शकतो.

स्पर्धेच्या सुरुवातीला झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड सामना पावसामुळे पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. त्या वेळी दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला आणि त्या एका गुणाने पुढील पात्रता समीकरणांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यामुळे सुपर-8 मधील कोणताही सामना पावसामुळे रद्द झाल्यास त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात.


Protected Content

Play sound