पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशनतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कारासाठी पंडित जितेंद्र अभिषेकी आणि विदुषी किशोरी अमोणकर यांच्या शिष्या, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या गायिका विदुषी देवकी पंडित यांना जाहीर करण्यात आला आहे.
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराचे वितरण समारंभ १ सप्टेंबर २०२४ रविवार रोजी पुण्यातील एम. इ. एस. बालशिक्षण सभागृह, मयूर कॉलनी येथे आयोजित करण्यात आले आहे. या पुरस्काराचे वितरण सुविख्यात शास्त्रज्ञ, पद्मभूषण विजय भटकर यांच्या हस्ते होणार आहे.
याबाबतची माहिती गानवर्धन संस्थेचे अध्यक्ष दयानंद घोटकर आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू यांनी दिली आहे. शाल, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ आणि ५० हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे. स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्कार वितरणाचा उपक्रम गेल्या १२ वर्षांपासून राबविला जात आहे.