संशयास्पदरित्या फिरणाऱ्याला एकाला अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील जुनी सरस्वती डेअरीच्या गल्लीत संशयास्पदरित्या फिरत असणाऱ्या एकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिकेत आनंद सोनवणे (वय-२४, रा.महाबळ, जळगाव) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे सोमवारी १८ मार्च रोजी रात्री शासकीय वाहनाने शहर पोलीस ठाण्याचे हद्दीतील हद्दपार आरोपींच्या शोध घेत असताना पहाटे ३ वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील जुनी सरस्वती डेअरीच्या गल्लीमध्ये संशयित म्हणून अनिकेत सोनवणे हा पोलिसांना पाहून लपला होता. दरम्यान शहर पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याची विचारपूस केले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर उन्हाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अनिकेत आनंद सोनवणे यांच्या विरोधात जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content