
मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात महावितरणच्या परवानगीशिवाय ट्रान्सफार्मर बसवण्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच आणखी एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील सातोड गावाजवळील स्मशानभूमी परिसरात संशयास्पद पद्धतीने ट्रान्सफार्मर बसवण्यात आल्याची माहिती समोर आली असून या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित ट्रान्सफार्मर हा अधिकृत प्रक्रियेशिवाय आणि महावितरणच्या परवानगीशिवाय बसवण्यात आल्याचा आरोप होत असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यात यापूर्वीही विनापरवानगी रोहित्र बसवण्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्या घटनेची चर्चा स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात झाली होती. माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरही संबंधितांवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. आता त्याच पार्श्वभूमीवर सातोड परिसरात पुन्हा ट्रान्सफार्मर बसवण्याचा प्रकार समोर आल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, सातोड गावाजवळील स्मशानभूमी परिसरात गेल्या काही दिवसांत रात्रीच्या वेळेस संशयास्पद हालचाली सुरू होत्या. परिसरात अनोळखी वाहनांची ये-जा होत असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिल्याचे सांगितले आहे. त्यानंतर काही दिवसांतच त्या ठिकाणी ट्रान्सफार्मर उभा करण्यात आल्याचे निदर्शनास आले. विशेष म्हणजे या कामासाठी ग्रामपंचायतीची कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आल्याची माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. तसेच महावितरणच्या स्थानिक कार्यालयाच्या अधिकृत नोंदीतही या ट्रान्सफार्मरचा उल्लेख नसल्याची चर्चा असल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच संशयास्पद बनले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रान्सफार्मर हा राज्याबाहेरून अनधिकृत मार्गाने आणण्यात आल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली तरी त्यातून मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराची शक्यता वर्तवली जात आहे. वीज यंत्रणेशी संबंधित उपकरणे विनापरवानगी बसवली जात असतील, तर तो केवळ प्रशासनातील निष्काळजीपणाचा प्रश्न नसून गंभीर आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवहाराचा भाग असू शकतो, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे सातोड आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना वाढत आहे. “वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने संबंधित ठेकेदारांचे मनोबल वाढले आहे. जबाबदार अधिकाऱ्यांनी याप्रकरणी तत्काळ हस्तक्षेप करावा,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित ठेकेदारांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही स्थानिक नागरिकांनी केली आहे.



