नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय औद्योगिक दलाच्या (सी.आर.पी.एफ.) जवानांनी राजधानीच्या चांदणी चौक मेट्रो स्टेशनमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याने सी.आर.पी.एफ.चा गणवेश घातला होता. पकडण्यात आलेल्या संशयिताने स्वतःचे नाव नदीम खान असल्याचे म्हटले आहे. तसेच तो शामलीचा रहिवासी असल्याचाही दावा करीत आहे.
चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, तो सी.आर.पी.एफ.चा ट्रेनी आहे व श्रीनगरमध्ये त्याचे ट्रेनिंग सुरू आहे. आईच्या अंत्यसंस्कारासाठी तो शामली येथे आल्याचेही त्याचे म्हणणे आहे. परंतु चौकशी केली असता त्याच्या आई-वडिलांची प्रकृती उत्तम असल्याचे उघड झाले आहे. तसेच तो श्रीनगरमध्ये कोणतेही ट्रेनिंग घेत नसल्याची बाबही स्पष्ट झाली आहे. त्या संशयित व्यक्तीजवळ दोन आधारकार्ड आढळले आहेत, त्यात त्याच्या वेगवेगळ्या जन्मतारखा आहेत. या संशयित व्यक्तीला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सध्या तपास यंत्रणा त्या व्यक्तीची कसून चौकशी करीत आहेत.
दुसरीकडे श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या आत्मघातकी साखळी बॉम्बस्फोटांमुळे भारतातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. श्रीलंकेत बॉम्बस्फोट घडवल्यानंतर संबंधित दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत असल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणांना प्राप्त झाली आहे. भारतात सध्या लोकसभा निवडणुकांचे वातावरण आहे. त्यामुळे दहशतवादी कोणत्याही घातपाती कारवाया करू शकतील, अशी शक्यता कायम आहे.