पाण्याच्या हौदात विष टाकून वन्यप्राण्यांची हत्या

jamner

जामनेर प्रतिनिधी । तालुक्यातील सोनाळा येथील शेतशिवारात पाण्याच्या हौदात विष टाकून वन्यप्राण्यांची हत्या केली. कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून रातोरात ती जेसीबी मशीनने खड्डा खेदून जमीनीत गाडून टाकली. मात्र याबाबत शनिवारी जामनेर वनविभाग अधिकाऱ्यांना माहिती मिळाली आणी घटनास्थळी पोहचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सरदार सरोवर प्रकल्पासाठी संपादीत जमीनीच्या मोबदल्यात जामनेर तालुक्यातील सोनाळा शिवारात गट क्रमांक १४८ ते १५२ पर्यंतचे गट पर्यायी वनीकरणासाठी वनविभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. यात बऱ्यापैकी वृक्ष बहरलेले असून जवळच दोन धरणे असल्याने या जंगलात वन्यप्राण्यांची संख्याही चांगली आहे. मात्र पर्यायी वनीकरणाला लागूनच पिंपळगाव व सोनाळा शिवार असून अनेक शेतकऱ्यांची शेती आहे. यामुळे वन्यप्राण्यांचा शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर त्रासही होतो. वन्यप्राणी त्रास देतात म्हणून सोनाळा येथील एका शेतकऱ्याने काही दिवसांपुर्वी पाण्याच्या हौदात विष टाकले. यात जवळपास १२ ते १५ मोर, आठ ते १० माकडे, एक काळवीट व एका निलगायीचा मृत्यु झाला. गावातील काही नागरीकांनी हा प्रकार बघीतला. काहींनी मोबाईलमध्ये फोटोही काढले. मात्र गावातीलच रहिवासी असल्याने वाद नको म्हणून हा प्रकार वनविभागापर्यंत पोहचला नाही. गावात मात्र याबाबत आपसात चर्चा होत हाेती. अखेर शनिवारी रात्री हा प्रकार जामनेर वनविभागाचे वनक्षेत्रपाल समाधान पाटील यांच्या कानी आला. त्यांनी शनिवारी रात्रीच घटनास्थळी जाऊन कर्मचारी व वनमजूरांकरवी संशय असलेल्या ठिकाणी खोदून पाहीले असता माकडांचे मृतदेह सापडले. रात्री उशीरापर्यंत हे खोदकाम सुरू होते.

याबाबत माहती मिळताच वनक्षेत्रपाल समाधान पाटील, फॉरेस्ट गार्ड प्रसाद भारूडे, वनपाल संदीप पाटील, वनमजूर जिवन पाटील यांना घेऊन सोनाळा जंगलात गेले. मिळालेल्या माहितीनुसार संबंधीत शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पाहीले असता जेसीबीच्या गेल्याच्या चाकांचे ठसे दिसून आले. विहिरीजवळ पडीक भागात नव्यानेच खड्डा करून तो बुजवलेला दिसला. त्या ठिकाणी खोदकाम केले असता माकडांचे मृतदेह आढळून आले. एका जेसीबी यंत्राणे खड्डे खोदून वन्यप्राण्यांचे मृतदेह पुरल्याचे समोर आल्याने ते जेसीबी कुणाचे होते. त्याने वनविभागाला माहती दन देता हा गुन्हा दडपण्यास सहकार्य केल्याने तोही गुन्हेगार होऊ शकतो. त्यामुळे ते जेसीबी कुणाचे होते व चालक कोण होता. हा प्रकार करणाऱ्या शेतकऱ्यासह जेसीबी व त्यावरील चालकाचा शोध घेऊन त्यावर वनविभाग कारवाई करणार का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थीत होत आहे.

Add Comment

Protected Content