प्रवाश्याची लॅपटॉपसह बॅग लांबविणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव प्रतिनिधी । नवीन बसस्थानकातून प्रवाश्याची लॅपटॉपसह बॅग लांबविणाऱ्या संशयिताला जिल्हा पेठ पोलीसांनी जळगाव रेल्वेस्थानकातून अटक केली आहे. लॅपटॉपसह बॅग हस्तगत केली आहे. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बब्बू भय्यालाल धुर्वे वय ३९ रा उमरखेडा खुर्द ता.जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश असे संशयिताचे नाव आहे.

जिल्हापेठ पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, अमळनेर येथील जिशान अशपाक पिंजारी हा तरुण शिक्षणाकामी नांदेड येथे वास्तव्यास आहेत. जिशान हे शनिवारी अमळनेर येथे जाण्यासाठी नांदेड येथून प्रवास करीत जळगाव बसस्थानकावर आले. जिशान यांच्याकडे एक लॅपटॉप असलेली बॅग तसेच इतर ३ अशा चार बॅगा होत्या. यादरम्यान त्यांची लॅपटॉप असलेली बॅग चोरीस गेली. सर्वत्र शोध घेवूनही बॅग न मिळाल्याने जिशान हे अमळनेरला निघून गेले. यादरम्यान रविवारी जळगाव रेल्वे स्थानकावर लोहमार्ग पोलिस स्टेशनच्या पोलीस उपनिरिक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक फौजदार राजेश पुराणिक व पोलीस कॉन्स्टेबल सचिन पाटील या कर्मचार्‍यांनी संशयास्पद हालचालींवरुन एका जणाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे लॅपटॉप असलेली बॅग मिळून आली. बॅग बाबत संशयित उडवाउडवीचे उत्तरे देत होता.

बब्बू भय्यालाल धुर्वे असे संशयिताचे नाव असल्याचे समोर आले. त्याने बॅग बसस्थानकावरुन चोरल्याची कबूली दिल्याने रेल्वे पोलिसांनी प्रकार जिल्हापेठ पोलीस स्टेशनला कळविला. त्यानुसार पोलीस निरिक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जुबेर तडवी, साहेबराव खैरनार यांनी रेल्वे पोलिसांकडून संशयित बब्बू धुर्वे याला ताब्यात घेतले. याप्रकरणी संशयिताविरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन पाटील हे करीत आहेत.

Protected Content