पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आगामी लोकसभा निवडणूकीसाठी विद्यमान खासदार महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार १८ एप्रिल रोजी पुण्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल आहे. बारामतीतील प्रमुख लढत सुप्रिया सुळे विरुध्द सुनेत्रा पवार अशीच होईल हे स्पष्ट झाले आहे. अजून इतर कोण उमेदवार अर्ज दाखल करतात या वरही मतांची किती विभागणी होणार हेही ठरणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वच सहा विधानसभा मतदारसंघात उन्हाचा तडाखा जाणवत आहे. प्रचंड उन्हात कार्यकर्त्यांना प्रचार करावा लागत आहे. त्या मुळे दुपारी प्रचार देखील थंडावत आहे. पूर्ण निवडणूकच भर उन्हात होत असल्याने सर्वच राजकीय पक्षांपुढे या कडक उन्हाचे आव्हान उभे ठाकले आहे. बारामती मतदारसंघात आता हळुहळू निवडणूकीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. प्रचारसभा, कोपरासभा, प्रत्यक्ष गाठीभेटी, संवाद, कार्यक्रमांना उपस्थिती, पत्रकवाटप, रॅली, पदयात्रा या माध्यमातून उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी प्रचाराला वेग देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.