ब्रेकींग : बीएचआर प्रकरणातील प्रमुख संशयित सुनील झंवरला अटक

जळगाव प्रतिनिधी | बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयित सुनील झंवर यांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्या चौकशीतून या प्रकरणाचे अनेक कंगोरे उघड होणार आहेत.

बीएचआर सहकारी संस्थेत आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी २७ नोव्हेंबर २०२० रोजी पुणे येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याच्यासह व्यावसायीक सुनील झंवर याचाही समावेश होता. तेव्हापासून झंवर हा फरार झालेला होता. त्याचे जामीन अर्ज अनेकदा नाकारण्यात आले होते. मध्यंतरी त्यांना अटकेपासून १५ दिवस दिलासा मिळाला होता. यानंतर मात्र त्यांच्या जामीनावर सुनावणी सुरू असल्याची माहिती समोर आली होती. यातच आज पहाटे पोलिसांनी नाशिक येथून झंवरला अटक केली आहे.

दरम्यानच्या काळात सुनील झंवर हा वेषांतर करून जळगावात आल्याची चर्चा होती. याच प्रकारे पोलिसांनी जंग जंग पछाडूनही सुनील झंवर यांचा पत्ता अद्यापही लागलेला नव्हता. दरम्यान, बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात सुनील झंवरचे पुत्र सूरज झंवर यांना आधीच जामीन मिळाला आहे. तर विवेक ठाकरे आणि सुजीत वाणी यांनाही जामीन मिळालेला आहे. बीएचआर गैरव्यवहाराच्या दुसर्‍या टप्प्यात तत्कालीक अवसायक जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे प्रमुख संशयित आरोपी आहेत. अनेक महिन्यांपर्यंत त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला होता. यानंतर गेल्या महिन्यात जितेंद्र कंडारे याला अटक करण्यात आल्यानंतर सुनील झंवर यांच्या अटकेची प्रतीक्षा होती. आता पुण्याच्या आर्थिक गुन्हा शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्याने या प्रकरणातील चौकशीला गती येणार आहे.

Protected Content