कोरोनाची लक्षणे असताना माहिती न देणे आरोग्यासाठी कोरोना विषाणूपेक्षा घातक – जिल्हाधिकारी राऊत

जळगाव, प्रतिनिधी । कोरोना विषाणू संसर्गाची साखळी रोखण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राज्यात माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या काळात आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरीकांची तपासणी करणार आहे. या तपासणीमध्ये नागरीकांना काही लक्षणे असल्यास त्याची माहिती नागरीकांनी स्वत:हून पथकास द्यावी, कोरोना सदृश्य लक्षणे, जुने आजार असूनही त्याची माहिती यंत्रणेला न देणे हे स्वत:च्या आरोग्यासाठी कोरोना विषाणूपेक्षा घातक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

जळगाव आकाशवाणी केंद्रावरुन माझे कुटूंब, माझी जबाबदारी अभियानाची माहिती देण्यासाठी आयोजित मुलाखतीत जिल्हाधिकारी श्री. राऊत बोलत होते.

जिल्हाधिकारी श्री. राऊत पुढे म्हणाले की, जिल्ह्यात यापूर्वीही सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. परंतु या अभियानात आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते सहभागी होणार असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही मोहिम महत्वपूर्ण ठरणार आहे. या मोहिमेत आरोग्य पथके घरोघरी जाऊन नागरीकांचे तापमान व ऑक्सिजन लेव्हल तपासणार असून ज्या नागरीकांना जुने आजार, कोरोनाची सदृश्य लक्षणे आढळतील त्यांची माहिती संकलीत करणार आहे. त्याचबरोबर लक्षणे आढळून आल्यास अशा संशयितांची तपासणी करुन आवश्यकता भासल्यास त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका व ग्रामीण क्षेत्रात 1 हजार 462 पथके तयार केली आहे. या पथकांमार्फत दररोज 50 पेक्षा अधिक कुटूंबाचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पहिल्या दिवशीच  जिल्ह्यात 13 हजार 615  कुटूंबांचे सर्व्हेक्षण करण्यात आले असून आवश्यकतेनुसार पथकांची संख्या वाढविण्याचे नियोजन केल्याचेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी सांगितले.

माझे कुटूंब, माझी जबाबदारी हे अभियान जिल्ह्यात 15 सप्टेंबर पासून सुरु झाले असून पहिला टप्प्या 10 ऑक्टोबर पर्यंत तर दुसरा टप्पा 14 ते 25 ऑक्टोबरपर्यंत राबविला जाणार आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यात सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे (SMS) या त्रिसुत्रीचा अवलंब करण्याबाबतही आरोग्य पथकांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. शिवाय कुटूंबातील ज्येष्ठ नागरीक, लहानमुले यांच्याबाबत घ्यावयाची काळजी, त्यांना ताप, सर्दी, खोकला असल्यास काय दक्षता घ्यावी याचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मोहिमेत सामाजिक बांधिलकीतून सामाजिक कार्यकत्यांनी स्वयंस्फुर्तीने मोठ्या संख्येने सहभागी होऊन ही मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रशासनास मदत करावी. त्याचबरोबर प्रत्येक नागरीकांने स्वत:ची व आपल्या कुटूंबाची जबाबदारी घेऊन त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास असल्यास त्याची माहिती आरोग्य पथकाला द्यावी. अथवा त्वरीत नजीकच्या रुग्णालयात जाऊन तपासणी करुन घ्यावी असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

त्वरीत तपासणी, त्वरीत उपचारामुळे आपल्या जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी घाबरुन न जाता जागरुक राहून या विषाणूचा प्रतिकार केल्यास आपला जिल्हा कोरोना विषाणूमुक्त होण्यास निश्चितपणे मदत होईल. कोरोनामुळे जिल्ह्यात झालेल्या मृत्युंचे विश्लेषण केले तर अनेक व्यक्ती या उपचारासाठी उशीरा आल्याचे दिसून येते. यामुळे अशा व्यक्तींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनाही मर्यादा येतात. तेव्हा मला कोरोना झाला हे इतरांना कळाले तर समाज काय म्हणेल, याचा विचार न करता कोणताही आजार अंगावर न काढता त्याची तात्काळ तपासणी करुन घ्यावी. ज्या बाधित रुग्णांना लक्षणे नसतील त्यांना कोविड सेंटरला ॲडमिट होण्याची आवश्यकता नसून त्यांना गृह विलगीकरणास परवानगी देण्यात येत असल्याने कुठलाही संकोच न बाळगता या मोहिमेस सहकार्य करुन माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेऊन प्रत्येक कुटूंबाने आपली खरी माहिती द्यावी व स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

Protected Content