ड्रग्ज प्रकरणात नाहक गोवले : सुनील पाटीलचा दावा

मुंबई प्रतिनिधी | ड्रग्ज प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात सापडलेल्या सुनील पाटील याने अखेर माध्यमांसमोर येऊन आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर, या प्रकरणात आपल्याला नाहक गोवण्यात आल्याचा दावादेखील त्याने केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कुंबोज यांनी वादग्रस्त ड्रग्ज प्रकरणाचा सूत्रधार हा सुनील पाटील असून त्याचे राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत संबंध असल्याचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे सुनील पाटील अचानक झोतात आला. मात्र दोन दिवसांपासून तो माध्यमांसमोर आला नाही. अखेर आज एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली.

यात सुनील पाटील म्हणाला की, प्रकरणाचा मास्टरमाईंड नाही. समीर वानखेडे यांच्याशी माझा कधीही संपर्क झाला नाही.गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये मी मुंबईत आलो होतो. तेव्हा मला राहायला घर नव्हतं. त्यामुळे चार सहा महिने मी ललित हॉटेलमध्ये थांबलो होतो. ललितमध्ये काहीच नव्हतं.

सुनील पाटील पुढे म्हणाला की, वळसे पाटलांना मी कधीच भेटलो नाही. अनिल देशमुख कोरोना काळात एकदा धुळ्यात आले होते. तेव्हा त्यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्याशी कधी भेट झाली नाही. मी जर बदल्यांचं रॅकेट चालवत आहे तर माझ्याकडे किमान १०० कोटी तरी असावेत ना. मी मोहित कंबोजला चॅलेंज करतो की धुळ्यात जाऊन माझ्या प्रॉपर्टीचा तपास कर आणि नंतर रॅकेटची वार्ता कर असे आव्हान त्याने दिले.

दरम्यान, या प्रकरणात आपल्याला गोवण्यात आले असून आपला घातपात होण्याची शक्यता असल्याचेही त्याने म्हटले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी कधीच सह्याद्रीला गेलो नाही. तेही काढा. सीसीटीव्ही फुटेज काढा सह्याद्रीचे. मी नवाब मलिक यांना कधीच भेटलो नाही. या प्रकरणावर १० तारखेला माझं नवाब मलिकांशी बोलणं झालं होतं. मी त्यांना सांगितलं, मला भीती वाटते की, माझ्यावर सर्व टाकून मला हे लोक मारून टाकतील असे सुनील पाटील म्हणाला.

Protected Content