जळगाव प्रतिनिधी | शहरातील शनिपेठ पोलीस स्थानकात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीने मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत मयत विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी जिल्हा रुग्णालयात येऊन पतीसह सासू, सासऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करत जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला. दरम्यान, शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पती प्रशांत पाटीलसह सासू,सासऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री प्रशांत पाटील (वय 26, रा. नेहरूनगर) यांनी मध्यरात्री दीड वाजता छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या शनिपेठ पोलिसात कार्यरत असलेले प्रशांत प्रकाश पाटील यांच्या पत्नी होत. भाग्यश्री यांनी रात्री गळफास आत्महत्या केल्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. पत्नी मयत झाल्याचे प्रशांत पाटील यांनी आपल्या साडूला फोनद्वारे कळविले. त्यानुसार साडूने सासरे अरुण जगन्नाथ पाटील (रा सैंदाणे ता. जि. धुळे) यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. आज सकाळी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेऊन नातेवाईकांनी सासरच्या मंडळीं विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
सासरच्या मंडळींनी आरोप केला आहे की, यापूर्वी पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील यांनी दारू पिऊन भाग्यश्रीला मारहाण करत होता. मुलगी रात्री दीड वाजता गळफास घेऊन मयत झाल्यानंतरही अद्यापपर्यंत पोलिसांनी कुठलाही पंचनामा न करता गुन्हा देखील दाखल झालेला नसल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. तसेच भाग्यश्रीचे शवविच्छेदन इन कॅमेरा करावे, तहसीलदारास समोर घटनेचा पंचनामा व्हावा, पतीसह सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा अपर पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी करत होते.