दिनकर नगरात तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शनीपेठ परिसरातील दिनकरनगरात राहणाऱ्या २८ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे आज सोमवारी ४ ऑक्टोबर रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. याप्रकरणी शनीपेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद  करण्यात आली आहे.

नरेश ऊर्फ बाळा रवींद्र सपकाळे (वय-२८) रा. दिनकर नगर, शनीपेठ परिसर असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी की, दिनकरनगरातील मोहन टॉकीजजवळ नरेश सपकाळे हा तरुण परिवारासह राहतो. त्याचे स्वतःचे ट्रॅक्‍टर असून तो त्या ठिकाणीच काम करून परिवाराचा उदरनिर्वाह भागवतो. रविवारीच त्याचा पगार झालेला होता. रात्री नेहमीप्रमाणे पत्नीसोबत जेवण केल्यानंतर घराशेजारच्या पार्टिशनच्या खोलीत तो झोपायला गेला होता. आज सोमवारी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास पत्नी लक्ष्मी यांनी उठून पाहिले असता नरेश याने गळफास घेतल्याचे त्यांच्या लक्षात आले. नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी त्याचा मृतदेह आणला  मयताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

 

 

 

Protected Content