Home क्राईम चोपड्यात गोडाऊनमध्ये सुरू असलेला कुंटणखाना उघडकीस; पोलिसांची धडक कारवाई, एकाला अटक

चोपड्यात गोडाऊनमध्ये सुरू असलेला कुंटणखाना उघडकीस; पोलिसांची धडक कारवाई, एकाला अटक

0
8


चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, धनवाडी रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमधील गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. २७ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी करण्यात आलेल्या या कारवाईत ५६ वर्षीय संशयिताला अटक करण्यात आली असून, पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा-धनवाडी रस्त्यावरील शेत गट क्रमांक १२५ मधील एका पत्र्याच्या शेडमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे २७ ऑक्टोबर रोजी दुपारी ३:४५ वाजता पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. या वेळी जगन्नाथ जानकीराम महाजन (वय ५६, रा. पाटील गढी, चोपडा) हा स्वतःच्या मालकीच्या गोडाऊनमध्ये आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेत असल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४ आणि ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकल आणि इतर साहित्य असा एकूण ९० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज वाळुंज आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास चोपडा शहर पोलीस करत आहेत.

धनवाडी रस्त्यावरील गोडाऊनमध्ये सुरू असलेल्या कथित अनैतिक व्यवसायावर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.

 


Protected Content

Play sound