पारोळा प्रतिनिधी । शहरातील गढरी गल्लीत दोन घराला पहाटेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दोन कुटुंबियांचे संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना घडली. पालिकेच्या अग्नीशमन बंबाने ही आग विझविली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र दोन्ही कुटुंब रस्त्यावर आले आहे.
सविस्तर माहिती अशी की, शहरातील रहिवाशी असलेले बापु रतन पाटील व बायजाबाई रतन पाटील यांच्या घराला आज पहाटे १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून मोठे नुकसान झाले. बापू रतन पाटील यांचे १ लाख २० हजारांचे तर बायजाबाई रतन पाटील यांचे १ लाख ६० हजार असे एकूण २ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. पारोळा नगरपालिकेचे अग्नीशामक बंब लवकर दाखल झाल्याने आग आटोक्यात आली. दोन वेगवेगळ्या घरातील साहित्याचा पंचनामा तलाठी निशिकांत पाटील यांनी केला.
यावेळी कैलास पाटील, मनोज पाटील, नगरसेवक मनीष पाटील यांच्यासह परिसरातील नागरिकांनी सहकार्य केले. दरम्यान आगीमुळे मजुर कुटुंब रस्त्यावर आले असुन शासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली जात आहे.