संधिवाताच्या समस्येने त्रस्त असलेल्या महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । मागील ५ ते ६ वर्षांपासून संधीवाताच्या समस्येने त्रस्त असलेली महिला ५ महिन्यांपासून पलंगावर खिळून होती, अशा रुग्णाची हिस्ट्री जाणून घेत जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ.दिपक अग्रवाल हे समस्येच्या मुळाशी गेले आणि रुग्णाच्या उजव्या खुब्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण महिला आता चालायला लागल्याने कुटूबियांनी डॉक्टरांचे आभार मानले.

मुक्‍ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा येथील उषाबाई भास्कर हिरोळे (वय ४७)ह्या गेल्या पाच महिन्यांपासून पलंगावर खिळून होत्या. संधीवातामुळे त्यांना हात-पाय तसेच जॉईंट्समध्ये तीव्र वेदना होत होत्या. मात्र जेव्हा दुखणे वाढले त्यावेळपासून रुग्ण महिलेचे चालणेही बंद झाले. जवळच्या मलकापूर येथील डॉ.चोपडे यांच्याकडे रुग्णाला घेऊन नातेवाईक गेले असता त्यांनी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात जाण्याचा योग्य सल्‍ला दिला. येथे आल्यावर डॉ.दिपक अग्रवाल यांनी रुग्णाची तपासणी केली तसेच आवश्यक चाचण्याही करुन घेतल्यात. यातून रुग्णाचा खूबा जागेवरुन सरकला असल्याने महिलेला तीव्र वेदना होत होत्या. तात्काळ टोटल हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करावी लागणार असा सल्‍ला डॉक्टरांनी दिला.

नातेवाईकांच्या संमतीनंतर जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉ.दिपक अग्रवाल यांनी शस्त्रक्रिया केली. त्यांना रेसिडेंट डॉ.सुनिल वेलणकर, डॉ.परिक्षीत पाटील, भुलतज्ञ डॉ.देवेंद्र चौधरी यांचे सहकार्य लाभले. अ‍ॅसिटाब्यूल प्रोट्रूसिओ अर्थात उजव्या खुब्याच्या शस्त्रक्रियेनंतर लगेचच डाव्या बाजूला एव्हीएल अर्थात एव्हस्कुलर नेक्रोसिस करण्यात आले, यात कोअर डिकम्प्रेसर बसविण्यात आले, जेणेकरुन रक्‍तपुरवठा सुरळीत राहील. एकाच दिवशी ह्या दोन्ही शस्त्रक्रिया झाल्या, तीन आठवड्यानंतर रुग्ण आपल्या पायांवर चालायला लागली.

खुब्याच्या दुखण्यांवर उपचार

हाडे, मणके असो वा खुब्याची दुखणे यावर तात्पुरता औषधोपचार घेऊन उपयोग होत नाही. अशा दुखण्यांसाठी स्पेशालिस्ट डॉक्टरकडून रुग्णांनी तपासणी करुन घ्यायला हवी. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया येथे उपलब्ध असतात, त्यामुळे आजच आपली जुनाट वा नविन दुखणी घेऊन रुग्णालयात यावे आणि निश्चिंत व्हावे, असे आवाहन डॉ.दिपक अग्रवाल, जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन यांनी केले.

आई चालू शकणार नाही असेच वाटले – मुलगा

मात्र येथील उपचाराने आई चालायला लागली. माझी आई शेतीकाम करायची मात्र संधीवाताचा त्रास सुरु झाला आणि ती आता घरीच असते, मात्र मागील पाच महिन्यात दुखणे इतके वेगाने वाढले की आता ती कधीच चालू शकणार नाही असे मला वाटले, मात्र मलकापूर येथील डॉ.चोपडे यांनी आम्हाला येथे जा असे सांगितले आणि खरोखरच येथे झालेल्या शस्त्रक्रिया आणि डॉक्टरांच्या वेळोवेळी मार्गदर्शनसोबतच प्रोत्साहनाने आई चालायला लागली, त्याबद्दल मी रुग्णालयाचे आभार मानतो. अशी प्रतिक्रिया विक्‍की हिरोळे (रुग्णाचा मुलगा) यांनी दिली.

Protected Content