जेलमधून पळणार्‍याला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर पकडले : भर दिवसाचा थरार !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खुनाच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या कैद्याने भर दिवसा तुरूंगातून पलायन केल्याचा प्रयत्न घडला असून त्याला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरच शिताफीने अटक करण्यात आली आहे.

खूनाच्या गुन्ह्यात दीड वर्षांपासून कारागृहात बंदी असलेल्या विजय चैनाम सावकारे (वय-२३, रा. चुंचाळे ता. यावल) याने जळगाव कारागृहातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास घडली. परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्याला अवघ्या काही अंतरावर पकडण्यात यश आले. त्या बंदीविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील विस्तृत माहिती अशी की, रामानंद नगर परिसरात निवृत्ती काशिनाथ पवार हे कारागृहात शिपाई म्हणून नोकरीस आहे. कारागृहात गेल्या दीड वर्षांपासून खूनाच्या गुन्ह्यात विजय चैत्राम सावकारे हा बंदी म्हणून कोठडीत आहे. शनिवारी १६ सप्टेंबर रोजी सकाळी ते संदीप अर्जुन थोरात, दिनेश दत्तू बारी, नागनाथ सुदाम येईल्वाड हे तिघे कर्मचारी कारागृहाच्या मेन गेटवर ड्युटीवर होते. सव्वासहा वाजेच्या सुमारास कारागृहाचा दरवाजा बाहेरुन कोणीतरी ठोठावला. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले, परंतु त्यांना कोणीही दिसून न आल्याने त्यांनी दरवाजा उघडून बघितले. याचवेळी कारागृहातील बंदी विजय सावकारे याने पोलिसाला धक्का देवून तो कारागृहाच्या मेनगेटमधून पळून गेला.

क्षणार्धात हा प्रकार घडल्याने पोलीस कर्मचार्‍यांनी आरडा-ओरडा करत पळालेला बंदी विजय सावकारे पाठलाग केला. याचवेळी कारागृहाकडे येत असलेले कारागृह शिपाई अनंत केंद्रकर व गणेश सोनवणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्यप्रवेद्वारावर त्याला पकडले. त्यानंतर त्याला पुन्हा त्याची कारागृहात रवानगी केली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहे.

Protected Content

%d bloggers like this: