चोपड्याच्या प्रितेश पाटीलचे अमेरिकेतील स्पर्धेत यश

pritesh patil chopdaचोपडा प्रतिनिधी । अमेरिकेत पार पडलेल्या ऍरो डिझाईन स्पर्धेत चोपडा येथील रहिवासी व श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागाचा विद्यार्थी प्रितेश प्रफुल्ल पाटील या विद्यार्थ्याने यश संपादन केले आहे.

श्रीमती काशीबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या यांत्रिकी विभागातील विमान संचार शास्त्र संघाने या स्पर्धेत सहभाग घेऊन यश मिळवले. विमान निर्मितीशी संबंधित अभ्यास रचना निर्मिती आणि वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेण्यासाठी या संघाची स्थापना करण्यात आली आहे ही स्पर्धा नुकतीच कॅलिफोर्नियामधील व्हेन न्युस येथे पार पडली. यात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विमान प्रतिकृतींच्या अनेक तपासण्या पार कराव्या लागतात. या स्पर्धेत चोपडा येथील रहिवासी व जिल्हा परिषद मराठी शाळा काजीपुरा येथील मुख्याध्यापक प्रफुल्ल नवल पाटील आणि जिल्हा परिषद शाळा माचला येथील मुख्याध्यापिका अनिता मुरलीधर पाटील यांचा सुपुत्र प्रितेश प्रफुल्ल पाटील याने संघासह सहभाग घेऊन यश मिळवले. जर्मनी, जपान, चीन, अमेरिका इत्यादी देशाच्या संघांनीसुध्दा या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याच्या या यशाबद्दल चोपडा व परिसरात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. तो प्रताप विद्या मंदिराचा माजी विद्यार्थी आहे. या स्पर्धेसाठी त्याला नवले अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content