मेहनत, सचोटी, एकाग्रता या गुणांच्या बळावर मिळते यश – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

पोलीस, सैन्य दलाच्या प्रशिक्षणासाठी शिरसोलीत संघर्ष करिअर अकॅडमीची स्थापना 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  कुठलेही ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी मेहनती बरोबर सचोटी देखील असावी लागते.  त्याचबरोबर ध्येयाप्रती लक्ष्य एकाग्र करून  सैन्यदल व पोलीस भरतीमध्ये निश्चित यश प्राप्त करता येते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथे संघर्ष करिअर अकॅडमीचे बुधवार दि. ६ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. पोलीस व सैन्य दलात भरती होण्यासाठी तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळावे याकरिता संघर्ष अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे.

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रस्तावनेमधून अकॅडमीचे संचालक योगेश राठोड यांनी अकॅडमीविषयी माहिती देऊन विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा दिल्या जातील व त्याचा उद्देश थोडक्यात स्पष्ट केला. यानंतर नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच शिरसोलीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आगमन झाले. याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी अकॅडमीला सदिच्छा देऊन तरुणांना सैन्यदल व पोलीस भरतीसाठी घडवण्याकरिता अकॅडमीने विशेष परिश्रम घ्यावे. मार्गदर्शन हवे असल्यास पोलीस दल सहकार्य करेल,  अशी ग्वाही निरीक्षक हिरे यांनी दिली. तरुणांना सैन्यदल, पोलीस भरतीसह प्रशासकीय सेवेमध्ये येण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठी पूर्ण शारीरिक व बौद्धिक ताकद लावून यश संपादन करण्यासाठी शंभर टक्के द्यावे लागतील असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

Protected Content